धरतीआबा- क्रांतिसूर्य बिरसा मुंडा
₹310.00
(Dhartiaaba Krantisurya Birsa Munda)
ले. चुडाराम बल्हारपुरे
श्री. चुडाराम बल्हारपुरे यांनी लिहिलेले हे ऐतिहासिक नाटक, ‘बिरसा मुंडा’ या आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक, समाजसुधारक स्वातंत्र्य योद्धाचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा थरारक प्रवास उलगडणारे आहे. १८७५ साली जन्म होऊन वयाच्या केवळ पंचविसाव्या वर्षी आपल्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या बिरसा मुंडाची ही जीवनगाथा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सुवर्णपान असून त्याचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आजही प्रेरणादायी, अनुकरणीय असेच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे बिरसाचे जीवनचरित्र लेखकाने या तीन अंकी नाटकातून सूत्रबद्ध मांडल्याने सव्वाशे वर्षांपूर्वीचा आदिवासींचा जाज्वल्य इतिहास, स्वातंत्र्याची ओढ, संस्कृती रक्षण व अंधश्रद्धा-अन्याय-अत्याचारापासून मुक्तीसाठी त्यांनी दिलेला लढा रसिकांसमोर दृश्यसाकार होतो.
– प्रा. डॉ. श्याम मोहरकर, जे. बी. नगर, चंद्रपूर.
ब्रिटिश सरकारच्या विरोधात जल, जंगल आणि जमीन यांच्या हक्कांसाठी पहिला उठाव करणारे येथील मूलनिवासी जनतेचे महानायक म्हणजे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा! त्यांच्यावरील हे क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवणारे नाटक आहे. अशा प्रकारची नाट्यकृती साकारणे ही अत्यंत मौलिक घटना आहे.
– डॉ. प्रा. जनबंधू मेश्राम, सिंदेवाही, चंद्रपूर.
प्रचंड व्यासंग व संशोधनातून लिहिले गेलेले हे नाटक मनाचा ठाव घेणारे आहे. नाटक वाचताना त्यातील सातत्य, संशोधक वृत्ती, संदर्भसापेक्षता आणि प्रचंड परिश्रम याची जाणीव पदोपदी होते. हे नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करीत पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या सुवर्णमय वारशाविषयी अभिमान जागृत करीत चेतना देणारे आहे.
– अनिरुद्ध वनकर, चंद्रपूर.
श्री. चुडाराम बल्हारपुरे यांचे ‘धरतीआबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा’ हे तीन अंकी क्रांतिनाट्य वाचले आणि मी अक्षरश: थक्कच झालो. ब्रिटिश सरकारला सक्रिय विरोध करत सर्व आदिवासींच्या मनात आत्मसन्मान जागृत करून, आपल्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी प्रेरणा देऊन अगदी कोवळ्या वयात शहीद झालेल्या या थोर क्रांतिसूर्याचा जीवन संघर्ष, आणि त्या संघर्षाचा अभ्यास करून उत्कृष्ट साहित्यमूल्य व रंगभूमीवर सादर करण्यासाठी आवश्यक ते प्रयोगमूल्य असलेले हे अप्रतिम नाटक वाचून मी भारावून गेलो. अशा प्रकारचे प्रेरणादायी लेखन, पुस्तकरूपात सादर करताना एक प्रकाशक म्हणून एक वेगळेच समाधान आहे…
– पराग र. लोणकर, पुणे.