सुखाची रोजनिशी
₹100.00
(Sukhachi Rojnishi)
ले. डॉ. अमित करकरे
सुख मानण्यात असते. पण आपण जगताना सुखाच्या नोंदी घ्यायला विसरतो आहोत. बदलते जग, बदलती जगरहाटी, वाढलेला वेग, पर्यावरणाचा ऱ्हास, अपेक्षांचे प्रचंड ओझे, आकांक्षांचा पसारा, कधीच पूर्ण न होणाऱ्या इच्छा, या सततच्या उद्विग्न करणाऱ्या जाणिवांमुळे आपण जीवनातील आनंद काहीसा हरवून बसलो आहोत.
जगताना क्षणाक्षणाला मिळणाऱ्या काही सर्प्राइजेसची जाणीव होण्यासाठी आणि जे आयुष्यात खरोखरीच उत्कृष्ट असे मिळाले आहे त्याची आठवण करून त्याबद्दल कृतज्ञ राहण्यासाठी आपल्याला त्याच्या नोंदी करून ठेवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी डॉ. अमित करकरे यांनी तयार केलेली ‘सुखाची रोजनिशी’ तुमच्या उशाशी कायम असणे आवश्यक आहे.
असे काय आहे या पुस्तकात?
यात तुमच्यासाठी एक महिना म्हणजे तीस दिवसांसाठी नोंदवून ठेवण्यासाठी काही गोष्टी आहेत. प्रत्येक दिवशी डॉक्टर आपल्याला गोष्टीरूपातील एक प्रसंग सांगतात. आणि हा प्रसंग सांगितल्यानंतर त्यांनी तुम्हाला त्या दिवसाच्या नोंदींसाठी काही मुद्दे दिले आहे. ‘सुखाची रोजनिशी’ अशाप्रकारे तुम्हाला तीस दिवस एक-एक गोष्ट लक्षात आणून देऊन कृती करायला सांगते. आणि मला खात्री आणि माझा अनुभव आहे की याचा खूप उपयोग होतो. मी माझ्या आजारपणाच्या काळात यातील बऱ्याच गोष्टी कृतीत आणल्या आणि त्याचा मला प्रचंड उपयोग झाला आहे.
डॉ. करकरे हे एक प्रसिद्ध होमिओपॅथ आहेत आणि लेखकही आहेत. त्यांनी डॉ. अल्बर्ट एलिस इन्स्टिटयूटमधून रॅशनल इमोटीव्ह बिहेवियरल थेरपीचे प्रशिक्षण घेतलेले आहे आणि विवेकनिष्ठ विचारसरणीने आयुष्य किती सहज, सोपे, सुंदर होऊ शकते, यासाठी ते काम करत आहेत. पुस्तकाची रचना, मांडणी अतिशय देखणी आहे आणि जे सांगायचे आहे ते अतिशय थेट आणि लगेच मनाला भिडणारे आहे.
प्रत्येकाने हे पुस्तक फक्त वाचू नये तर सतत जवळ बाळगावे असे आहे.
– वर्षा वेलणकर




