प्राक्तन

430.00

(Praktan)
ले. रविकिरण संत

टेक्स्टाइल इंजिनिअर असलेले रविकिरण संत हे आधी नोकरी आणि नंतर व्यवसायानिमित्त देश-विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी राहिले आहेत. त्यांच्या विनोदी, सामाजिक, तसेच कार्पोरेट विश्वाचे समग्र दर्शन घडविणाऱ्या साठहून अधिक कथा प्रकाशित आहेत. दोन-तीन वर्षांपासून त्यांच्या फेसबुकवरील काही विनोदी पोस्ट्स वाचण्यात आल्या आणि मला त्या मनापासून आवडल्या. त्यांची निखळ विनोदी, साधी-सोपी शैली मन वेधून घेणारी वाटली. हसवून हसवून लोळवण्याची ताकद त्यांच्या लेखणीत आहेच, ह्यात शंकाच नाही, पण त्याच जोरकसपणे ‘प्राक्तन’ ह्या कादंबरीत गंभीर विषयपण त्यांनी हाताळला आहे.

जन्म आणि मृत्यू ह्यांच्या दरम्यानचा अवकाश म्हणजे माणसाचं जगणं. ह्या जगण्यात अनेक चढउतार येतात. गोल्डीच्या आयुष्यातील चढउतार, यश-अपयश, कौतुक-अवहेलना, प्रेम आणि आत्मसन्मान ह्यांच्यातील द्वंद्वाची ही कथा आहे. साधारणपणे साठच्या दशकातील एका देखण्या तरूणाची, गोल्डीची एका राजघराण्यातील युवतीशी ओळख होते, पुढे ते लग्नाच्या बेडीत अडकतात आणि गोल्डीचा राजघराण्यात वावर सुरू होतो. या नंतरची प्रेम की आत्मसन्मान ह्याची जबरदस्त कशमकश लेखकाने रंगवली आहे.

राजेशाहीच्या पार्श्वभूमीवर फुलणारी ही प्रेमकथा सुरस तर आहेच पण उत्कंठावर्धकही आहे. मानवी भावभावनांच्या मनोव्यापाराचे मनोज्ञ दर्शन कथा घडवते. कथेत कधी थरार आहे, कधी रहस्य आहे तर कधी शृंगारही आहे. पण सगळेच रस लेखकाने अतिशय संयमितपणे हाताळले आहेत हे विशेष.

त्यानंतर कादंबरीच्या उत्तरार्धात राकेश हा ह्याच राजघराण्याशी नाते असलेला तरूण कादंबरीच्या पटावर येतो. त्याचं भोगवादी जगणं, त्याची प्रवृत्ती आणि त्याची नियती, त्याचं प्राक्तन पुढच्या भागात वेगवेगळ्या प्रसंगांच्या रूपात येतं. पूर्वार्धाप्रमाणेच हा उत्तरार्धही वाचकाला खिळवून ठेवणारा आहे.

– नीलिमा क्षत्रिय.

You may also like…