कालचक्र
₹400.00
(Kalchakra)
ले. दत्तात्रय सैतवडेकर
~
आजच्या जीवनातील व्यामिश्रता, स्त्री-पुरुषांचे मोकळे होत चाललेले वागणे, त्यातील गुंतागुंत लेखकाने या कथांत नेमकेपणाने पकडली आहे. आधुनिक तरुण-तरुणींचे वागणे, व्यवहारी जगणे; तरी त्यातील एकाचे जुन्या मूल्यांना धरून असणे, यामुळे होणारा संघर्ष फार बारकाईने टिपला आहे. ह्या संग्रहातील एक-दोन कथांमध्ये तर कादंबरी होतील, असे जर्मस आहेत.
या संग्रहातील कथांची वैशिष्ट्ये सांगायची तर चमकदार संवाद आणि धक्कादायक शेवट, ही म्हणावी लागतील. अत्यंत आक्रमक स्त्री पात्रं आणि त्यांचं अचानक, पण त्यांच्या स्वभावानुकूल वागणं वाचून वाचक चक्रावून जातो. अर्थात त्याला वाचनानंद मिळतो. कुटुंबातील ताणतणाव, प्रिय व्यक्तिने, सहकाऱ्याने केलेला दगाफटका आणि त्याचे अचूकपणे काढलेले उट्टे वाचतांना हातातून पुस्तक खाली ठेवता येत नाही.
‘सवड’मधील सुनंदा वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या देहदानाचा निर्णय घेऊन कोणते तिढे टाळते? ‘दहशत’मधील पियू, ज्याला जो गुंड प्रवृत्तीचा आहे- ज्याला आपली राहती जागा हवी असते आणि ही ज्याची सर्वांना दहशत असते, त्या जयस्वालला कसे अडकवते? ‘फेसबुक’वरील वयस्क पण देखण्या आणि लाघवी बोलणाऱ्या व्यक्तिच्या आकर्षणात एक तरुणी वेडीपिशी होते. तिच्या मैत्रिणीने सांगितलेला मित्र म्हणून त्यांच्याशी लगट करू लागते. मानसिकरित्या त्यांवर विसंबू लागते; पण तिची मैत्रीणच तिला आणि तिच्या सारख्यांना जाताजाता सावध करते. आजचे वास्तव आपल्याही अंगावर येते. यात तरुणांच्या आवेगी प्रेमाच्या आणि सूडाच्या कथा आहेत, असे नाही तर, वयस्कांच्या मुलांच्या अपरिहार्य न परतीच्या वाटेवरचे अनुभवही सत्यात आलेले दिसत आहेत. ‘कालचक्रा’त बसलेले आजचे जोडपे कालचे नि उद्याचे आपले संबंध अनुभवू शकले तर ते कसे असेल अशी विज्ञानिकाही आहे.
एकूणच प्रसन्न शैलीच्या या लघुकथा पुन्हा लघुकथांचे सामर्थ्य दाखवून वाचकाला आपलेसे करतील अशा आहेत. श्री. दत्तात्रय सैतवडेकरांचे अभिनंदन!
– संजीवनी खेर




