Description
श्रीमती नलिनी भुजंग यांचा परिचय.
जन्म – फाळणीपूर्वी बेळगाव येथे १९४० साली.
शिक्षण मुंबई, पुणे, बेळगाव, दिल्ली येथे.
मार्च १९६२ मध्ये श्री. वसंत भुजंग यांच्याशी विवाह. एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये.
नलिनीजींच्या लेखनात नात्यांच्या आणि मनुष्यस्वभावाच्या सूक्ष्म निरीक्षणाचा अनुभव आढळून येतो. हा अनुभव त्यांना त्यांच्या वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे मिळाला. या फिरतीच्या नोकरीमुळे त्या संपूर्ण भारतात ठिकठिकाणी फिरू शकल्या. अनेक प्रकारच्या लोकांशी संबंध आला, त्यांच्या स्वभावांचे निरीक्षण करता आले. हे निरीक्षण आणि हा अनुभव त्यांच्या कथांमधून दृग्गोचर होतो.
दिल्ली येथे आल्यावर त्यांनी हिंदीतही कथालेखन व शायरी लेखन केले आहे.
२४ वर्षे दिल्लीच्या वास्तव्यानंतर १९८४च्या सप्टेंबरमध्ये देशांतराचा योग आला आणि भुजंग कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. बदललेले वातावरण, बदललेला निसर्ग, संस्कृती, चालीरीती, जेवणखाण, या सर्व गोष्टींमुळे लेखिकेच्या लेखनाला नवा आयाम मिळाला. याचा प्रभाव त्यांच्या कथा आणि कवितांवर दिसून येतो…
****
माझा नलिनीताईंच्या लिखाणाशी परिचय झाला ते वर्ष बहुदा २००८ असावं. २०१३पासून मी आमच्या महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरियाच्या `हितगुज` या दिवाळी अंकाचे संपादन सुरु केल्यापासून त्यांच्या लिखाणाचा आवाका मला जाणवू लागला. नलिनीताईंच्या वास्तवदर्शी कथा या हितगूज अंकाचे प्रमुख आकर्षण असते. त्यांच्या कवितासुद्धा मानवी स्वभावाचे विविध पैलू उलगडून दाखवितात.
नलिनीताई मुळातच अत्यंत मनमिळावू व प्रेमळ आहेत. त्यांच्या स्वभावातील गोडवा कथानकातील पात्रांतून झिरपतो व त्यामुळेच वाचकांस ती सहृदयी पात्रे आपल्या जवळची वाटतात. त्यांचा विविध विषयांवरचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे.
चोखंदळ वाचकांच्या पसंतीस ताईंचे लिखाण पूर्णपणे उतरले आहे. नलिनीताईंच्या पुढील लेखनप्रवासासाठी भरपूर शुभेच्छा!
– सौ. प्रतिभा अटनेरकर