जोडीदार
₹250.00
(Jodidar)
संपादक : श्री. चुडाराम बल्हारपुरे
दि. २६ मे २०२४ रोजी ‘नाट्यश्री साहित्य कलामंच गडचिरोली’च्या वतीने झाडीपट्टीतील ज्येष्ठ कवी, गायक व कव्वाल वामनदादा गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली, प्रसिद्ध स्तंभलेखक विनायकराव ऊईके यांचे उपस्थितीत एक कविसंमेलन घेण्यात आले. यावेळचे नाट्यश्रीचे कविसंमेलन आगळेवेगळे होते. सर्व कवींना एक विषय देण्यात आला होता. तो म्हणजे- ‘जोडीदार.’
प्रत्येक कवी/कवयित्रींच्या आपल्या जोडीदारावरील प्रेमभावना, राग-लोभ, आशा-अपेक्षा व्यक्त करणारे हे कविसंमेलन होते. विषय एक, संकल्पना एक, कवी अनेक. शीर्षक वेगळे, भावना वेगळ्या अशा या नाविन्यपूर्ण कविसंमेलनास झाडीपट्टीतील एकूण पासष्ट ज्येष्ठ, श्रेष्ठ तसेच नवोदित कवींनी हजेरी लावून उत्स्फूर्तपणे आपापल्या बहारदार रचना सादर केल्या व संमेलनात चांगलीच रंगत आणली. या कविसंमेलनाची फलश्रुती म्हणजेच हा प्रातिनिधिक कवितासंग्रह- ‘जोडीदार!’
जेव्हा जीवनातील सर्व नाती संपलेली असतात, आई-वडिलांचं छत्र आपण गमावलेलं असतं किंवा त्यांच्या प्रेमाला पारखे झालेलो असतो, आपली पंख फुटलेली पाखरं स्वत:चा चारा शोधण्यासाठी दूर उडालेली असतात, नातेवाईकांच्या प्रेमालाही आपण मुकलेलो असतो, शेजारीपाजारी आपणास टाळत असतात, मित्रमंडळी जवळ येईनाशी होतात, तेव्हा आपला जीवनसाथी, आपला जोडीदार हाच एकमेव आधार असतो. कारण त्याचं प्रेम, त्याची माया-ममता कोणत्याही नाटक-सिनेमातील पात्रांसारखी नाटकी नसते. या जीवनातील संसारसृष्टीतील दोघांच्या मीलनाने निर्माण झालेली सर्वांगसुंदर कविता म्हणजेच- जोडीदार. याला पर्यायच नाही.
जोडीदार काय असतो, त्याचं आपल्या जीवनात काय स्थान असतं, हे त्यांनाच अधिक माहीत असतं, ज्यांनी आपला जोडीदार गमावलेला आहे. अशा काही जोडीदारांनीही या संग्रहात आवर्जून आपल्या त्या अनंताच्या प्रवासाला निघालेल्या चिरंतरांच्या स्मृतींना उजाळा देऊन आपल्या नयनातून बरसणाऱ्या अनाहूत अश्रूंना आणि त्यांच्या लेखणीतून प्रसवणाऱ्या भावनांना कवितेची वाट मोकळी करुन दिलेली आहे. अशा स्मृतींचा ठेवा जपण्याचंही कार्य या प्रातिनिधीक कवितासंग्रहानं केलं आहे.




