नियतीचा खेळ

280.00

(Niyaticha Khel)
ले. अनिल अभ्यंकर
~
कोणतीही भाषा टिकवून ठेवून तिचा प्रसार व प्रचार अधिकाधिक लोकांपर्यंत करण्यामध्ये त्या त्या भाषेत लेखन करणाऱ्या साहित्यिकांचा फार मोलाचा हातभार असतो. कोणत्याही भाषेच्या उत्कर्षासाठी त्या भाषेतील साहित्यसंस्कृती जास्तीत जास्त समृद्ध असणे अतिशय आवश्यक असते.

आपल्या मराठी साहित्य विश्वाने याबाबतीतला सुवर्णकाळ पाहिलेला आहे. एक प्रकाशक म्हणून मी आज साहित्यक्षेत्रात मुशाफिरी करणारे प्रस्थापित आणि ताज्या दमाचे लेखक आणि कवी जेव्हा पाहतो, तेव्हा वर्तमान आणि भविष्याविषयी देखील मी नक्कीच आशावाद बाळगून आहे. सकारात्मक आहे.

आज जे लेखक मराठी साहित्यविश्वात सातत्याने मोलाची भर घालत आहेत, अशा लेखकांमध्ये एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री. अनिल यशवंत अभ्यंकर. श्री. अभ्यंकर हे मूळचे देवासमध्ये म्हणजे मध्यप्रदेशात आपल्या आयुष्याचा फार मोठा काळ व्यतीत केलेले आहेत हे विशेष.

लहान मुलांसाठी नाट्यछटा, एकांकिका, नाटके लिहिणारे अनिलजी मोठ्यांसाठीही तितकेच सक्षमपणे लेखन करू शकतात हे त्यांचे आत्तापर्यंतचे प्रकाशित साहित्य बघितले की सहज लक्षात येते. मी मुख्यतः आत्तापर्यंत त्यांचे विनोदी साहित्यच बहुतांशी वाचले होते, मात्र हा प्रस्तुतचा ‘नियतीचा खेळ’ हा कथासंग्रह वाचल्यावर ते गंभीर प्रकृतीचे लेखनही तितकेच सक्षमपणे करू शकतात हे माझ्या लक्षात आले.

‘नियतीचा खेळ’ यामधील १५ कथांमध्ये विषयांची विविधता आहे. बहुतांश कथा सत्य घटनांवर आधारित व कौटुंबिक आहे. विविध नातेसंबंध, त्यामधील गुंतागुंत आणि ते गुंते सोडवण्यासाठी विविध प्रकारे केलेले प्रयत्न येथे आपल्याला पहावयास मिळतात. काही कथांमध्ये असलेला दुःखांत हा हुरहुर लावणारा व नकोसा वाटणारा असला, तरी त्या त्या ठिकाणी जीवनाचे वास्तव दर्शविले आहे हे आपण मान्य केलेच पाहिजे. शेवटी ‘नियती’ प्रत्येकाच्याच जीवनात तिचा भला-बुरा खेळ खेळत असते याचा अनुभव आपण प्रत्येक जण घेत असतोच. अर्थात, या संग्रहातील अनेक कथांमध्ये आशावाद व सकारात्मकताही आपल्याला पहावयास मिळते, जी आपल्याला सुखावते.

संग्रहातील काही कथा मैत्रीचे बंध आणि त्यांचे महत्व आपल्याला जाणवून देतात. दुसऱ्याची बाजू समजून घेण्यात आलेल्या अपयशामुळे विनाकारण निर्माण होणारे समज-गैरसमज यावरही काही कथा आधारलेल्या आहेत.

विषय आणि आशयात विविधता, साधे-सोपे लेखन आणि जसे अनुभवले, पाहिले, घडले, ऐकले तसे त्या त्या घटना, प्रसंग, किस्से यांचे कथारूपात ओघवते सादरीकरण हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य मला वाटते.

अनिलजींचा प्रकाशक असल्याने त्यांचे सर्वच्या सर्व पुस्तकरूपात प्रकाशित झालेले लेखन मी वाचलेले आहे. विनोदी कथालेखनात ‘गण्या’ आणि ‘गौरी’ हे त्यांचे आवडते नायक आणि नायिका आहेत. या दोघांना घेऊन एक फक्कड विनोदी कादंबरी ते लिहू शकतात, ज्यामध्ये विनोदाची अक्षरक्ष: लयलूट त्यांची लेखणी करू शकते याबाबत माझ्या मनात काडीचीही शंका नाही.

समाजातील विसंगती, आजचे शहाण्या माणसास अनाकलनीय झालेले पक्षीय राजकारण, विविध सोशल माध्यमांत चाललेली अतिशयोक्ती, मोबाइलसारख्या साधनांचा अतिरेक, टीव्ही मालिकांत दाखवल्या जाणाऱ्या तर्कशून्य गोष्टी, प्रेक्षकांना वेडे बनवणारे ‘रियालिटी शो’, क्षणाक्षणाला समोर आणल्या जाणाऱ्या ‘ब्रेकिंग न्यूज’ अशा अनेक गोष्टींवरील विनोद या कादंबरीत हास्यस्फोट घडवू शकेल, वाचकांना काही घटका निखळ आनंद देऊ शकेल, त्यांचे मनोरंजन करू शकेल. (नुकतेच एसटी महामंडळाने ‘शिवनेरी बसमध्ये हवाई सुंदरीच्या धर्तीवर शिवनेरी सुंदरी असेल,’ अशी काही संकल्पना आणली आहे, ज्याचा तपशील अजून- ही प्रस्तावना मी लिहीत असेताे- फारसा बाहेर आलेला नाही. हा प्रत्यक्षात एक मोठा विनोद सिद्ध होऊ शकेल, किंवा तसे न झाल्यास यावर चांगली विनोदनिर्मिती मात्र नक्कीच होऊ शकेल.) असे आपल्या आजूबाजूला घडणारे अनेक विनोद हेरण्याची दृष्टी खरं तर अनिलजींना मुळातच आहे. त्यामुळे हे सर्व मी त्यांना सुचवणे हे खरं तर कितपत योग्य आहे, हाही प्रश्न, मीच मला विचारत आहे. आणि यासाठी मी क्षमाप्रार्थीही आहे.

तरी- अशी धम्माल विनोदी कादंबरी आपल्या लेखणीतून साकार करण्याची श्री. अनिल अभ्यंकर यांना मी येथे करत असलेली सूचना त्यांनी मनावर घ्यावी या विनंतीसह, त्यांना त्यांच्या पुढील सर्व- विनोदी व अविनोदी लेखन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

– पराग रघुनाथ लोणकर
(प्रकाशक, लेखक व प्रमुख कार्यवाह- अ. भा. मराठी प्रकाशक संघ.)
*

You may also like…