रंग-लोलक
₹410.00
(Rang-Lolak)
(नाटक)
ले. रमेश कोटस्थाने
प्रा. रमेश कोटस्थाने यांच्या समर्थ लेखणीतून साकार झालेल्या – रंगमंचावर सादर करण्यास आदर्श अशा एक पात्री, अनेक पात्री नाट्यछटा या ‘रंग-लोलक’ संग्रहात आहेत. प्रेक्षकांइतकाच सादर करणाऱ्यालाही आनंद देतील, समाधान देतील अशा या कलाकृती असल्या, तरी फक्त वाचनासाठी पुस्तक हातात घेतलेल्या वाचकांनाही यात तितकाच आनंद मिळणार आहे. हे पुस्तक म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे, मोबाईल बाजूला ठेवून, टीव्हीवरच्या रटाळ मालिका दूर सारून चार घटका शांतपणे विरंगुळा मिळवण्यासाठीचे आपल्याला मिळालेले हे ‘गिफ्ट’ आहे.
काय काय आहे या मनोरंजनाच्या खजिन्यात? ‘आम्ही कसे आनंदात!’ हे धम्माल विनोदी नाटक यामध्ये आहे. हे वाचताना आपल्या डोळ्यासमोर ते साक्षात साकार होत असते, आणि आपण त्याचा जणू ‘लाईव्ह’ आस्वाद घेत असतो. त्यानंतर आपल्याला (डोळ्यांनी) ऐकायला मिळणार आहेत त्या ज्येष्ठ महिलांच्या, ताई-माई-अक्कांच्या कट्ट्यावरील ‘आंबट-गोड’ गप्पा! याही मजेशीर अशाच!
त्यानंतर ‘मी बर्व्यांचा बाळू बोलतोय,’ असं म्हणून एक ‘बाळू’ आपलं आत्मकथन आपल्यापुढे सादर करतो. इथे या बर्व्यांच्या बाळूनं त्याच्या जीवनाबद्दल आपल्याशी साधलेला संवाद, त्याने आपल्या जीवनात केलेले विविध प्रयोग, घेतलेले विविधरंगी अनुभव हे सारे धम्माल विनोदी शैलीत लिहिले गेले आहे. पुढची ‘भांडा सौख्यभरे’ ही अशीच एक पाच पात्रांमध्ये घडणारी धम्माल सदाबहार जुगलबंदी!
‘मी बाई माणूस’ हे एका समाजसेविकेचे आत्मकथन हा मात्र ‘रंग-लोलक’ मधील इतर लेखनापेक्षा हटके असा, बराचसा गंभीर प्रकृतीचा आविष्कार आहे. विनोदाशिवायच्या लेखनावरही लेखकाचे असलेले प्रभुत्व येथे लक्षात येते. यापुढील- एका आडगावी राहत असलेल्या, आपले नाट्य-कलेवरील प्रेम सांभाळून एक हॉटेल चालवणाऱ्या एका रंगकर्मीचे मनोगत ‘स्वगत-रंग’ हे देखील असंच! साधं, सोपं तरीही मनाला भिडणारं.
अशा ह्या साऱ्या– एकाहून एक सरस नाट्यछटा वाचत असताना आपल्या मनात लेखकाबद्दल जी उत्सुकता जागृत होते, ती काही प्रमाणात दूर करणारा लेख– या पुस्तकातील शेवटचा लेख- म्हणजे ‘मी लेखक बोलतोय..’ येथे आपला साहित्यप्रवास लेखकाने वाचकांपुढे ठेवला आहे.
एकूण हे पुस्तक (सर्व वयोगटातील) खऱ्या, दर्दी वाचकांनी वाचलेच पाहिजे असे आहे…
~