मोबाईल न वापरणारा माणूस
₹290.00
(mobile n vaparanara manoos)
श्री. अविनाश चिंचवडकर हे आजच्या विनोदी लेखकांतलं एक ‘रियली प्रॉमिसिंग’ नाव. त्यांच्या निवडक कथा या कथासंग्रहाद्वारे एकत्रपणे मराठी वाचकांच्या हातात पडत आहेत.
कोणत्याही प्रकारच्या निम्न पातळीच्या किंवा हलक्या दर्जाच्या विनोदांचा वापर न करता हास्यप्रधान प्रसंगांतून व गमतीदार वर्णनांतून त्यांनी या कथा फुलवल्या आहेत. हे फार कठीण काम त्यांनी कमालीच्या कौशल्याने केलेले आहे. हे विनोद प्रामुख्याने प्रसंगनिष्ठ आहेत. गुदगुल्या करीत गुंतवून ठेवण्याची शैली त्यांच्या कथांमध्ये आहे. स्वत: श्री. अविनाश चिंचवडकर उच्च विद्याविभूषित आहेत. जगप्रवास केल्यामुळे त्यांच्या अनुभवविश्वात असंख्य गोष्टींची भर पडलेली आहे.
या कथा काल्पनिक वाटल्या तरी त्यांचं बीज हे तुमच्या-आमच्या आयुष्यातच दडलेलं आहे. म्हणूनच बोफोर्सपासून फेसबुकपर्यंतचे विषय तुम्हाला या कथासंग्रहात आढळतील. प्रसंग व व्यक्ती यांची विलक्षण सुंदर गुंफण व प्रभावी संवादशैली यामुळे हा कथासंग्रह कमालीचा मार्मिक व मनोरंजक झाला आहे.
या विनोदी कथासंग्रहातील ‘न बोलणारी बाई’ किंवा ‘मोबाईल न वापरणारा माणूस’ शीर्षकावरून अशक्य व्यक्तींच्या या कथा वाटल्या तरी त्यामध्ये सामाजिक व्यंगावर उत्तम आघात केलेला आहे. ‘प्रभू रामचंद्र अयोध्येत’ किंवा ‘बेन किंग्जले अचानक पार्टीतून…’ या कथांमध्ये गाजलेले चरित्रनायक आज भारतात आले तर काय होऊ शकेल? ही कल्पना उत्तमरीत्या सादर केलेली आहे. मराठी माणसांची हॉटेलं चालत का नाहीत? या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे असेल तर श्री. चिंचवडकर यांची ‘मराठी माणसाने हॉटेल कसे चालवावे?’ ही कथा वाचायलाच हवी. ‘सिलेंडर येई घरा,’ ‘…अन् मी पॉप सिंगर झालो,’ ‘ओळख परेड,’ ‘कैदी पळाला भुर्र…’ या कथांमधून आजकालच्या सामाजिक व्यंगाचे व मनुष्य स्वभावाचे सुरस वर्णन केलेले आहे.
हा खुमासदार व प्रवाही शैलीतील कथासंग्रह एकदा हातात घेतल्यावर शेवटपर्यंत खाली ठेवावासा वाटणार नाही. हेच या कथासंग्रहाचं यश आहे.
– विवेक मेहेत्रे