भारत माझा देश आहे!
₹330.00
(Bharat Maza Desh Aahe!)
ले. जयवंत माजलकर
श्री. जयवंत माजलकर या कथा लेखकाचा “भारत माझा देश आहे!” हा कथासंग्रह वाचल्यानंतर, मला पहिल्यांदा आभार मानावेसे वाटले ते त्यांच्या कथा प्रसिद्ध करणार्या सर्व मासिकांच्या संपादकांचे. कारण या साहित्य गुणग्राहक संपादक महाशयांनी सरस्वतीच्या महनमंगल गाभार्यात एका दर्जेदार कथालेखकाला प्रवेश मिळवून दिला आहे.
“भारत माझा देश आहे!” कथासंग्रहात एकूण १९ कथा आहेत. या सर्व कथा साध्या-सोप्या भाषेत लिहिलेल्या असल्या तरी प्रत्येक कथेचा आवाका फार मोठा आहे. कथा प्रवाहीत आहेत, उत्कंठतावर्धक आहेत आणि प्रत्येक कथेचा शेवट वाचकाला एक अनपेक्षीत धक्का देऊन जातो. प्रत्येक कथानकातील वातावरण जीवंत वाटतं; मग ते चाळीतील असो किंवा घनदाट जंगलातील. आणि असं वाटण्याचं कारण म्हणजे लेखक ते ते वातावरण स्वत: जगलेला आहे. एखाद्या शिडाच्या नावेत बसावं आणि शिडात वारा भरल्यावर ती नाव जशी डौलात- झोकात प्रवास करते तसा प्रत्येक कथेचा प्रवास झालेला आहे. प्रत्येक कथेचा शेवट हा जयवंतराव माजलकरांचा प्लस पॉईंट! एखाद्या निष्णात गूढ कथाकार किंवा कादंबरीकाराच्या शैलीने त्यांनी चपखलपणे कथांचा शेवट केलेला आहे. ‘गूढ रम्यता’ आणि ‘माणूसकी’ यांचं प्रत्येक कथेत दर्शन घडतं.
माजलकरांच्या ‘भारत माझा देश आहे!’ संग्रहातील या कथा पुरस्कारांच्या शाल लेवून प्रसिद्ध झालेल्या आहेत. या संग्रहाला उदंड रसिकाश्रय मिळेल याची मला शंभर टक्के खात्री वाटते…
– गंगाराम म. गवाणकर