गुपित आनंदाचं!
₹335.00
(Gupit Anandacha)
ले. डॉ. मोहन खडसे
सुखं-दुःखं कुणाला नाहीत? माणूस म्हटला म्हणजे ते आलंच!
शिवाय, सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही वृत्ती प्रत्येक माणसात कमी-जास्त प्रमाणात असतातच. खरं तर प्रत्येक माणसाच्या जगण्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी असतात; आणि त्या वाईट गोष्टींच्या तुलनेत जास्तच असतात. पण तरीही माणूस नकारात्मक म्हणजेच वाईट गोष्टींकडे लवकर झुकतो, त्यांचंच चिंतन करत बसतो, आणि निराशेच्या गर्तेत राहतो, असा अनुभव आहे. हे टाळण्यासाठी त्याला संतुलित राहण्यासाठी जाणीवपूर्वक, मुद्दाम सकारात्मकतेचा दोर घट्ट पकडण्याचा प्रयत्न करावा लागतो.
‘गुपित आनंदाचं!’ या प्रस्तुत पुस्तकातील प्रा. डॉ. मोहन खडसे यांचं लेखन माणसाच्या आयुष्यातील या सकारात्मकतेची आणि आपली ओळख करून देण्याचा प्रयत्न करतं. डॉ. खडसे यांच्या या आधीच्या प्रकाशित झालेल्या ‘डे पॉझिटिव’, ‘जगणे आनंदाचे’ आणि ‘कवडसा’ या पुस्तकातील त्यांच्या याच विषयावरील लेखांना वाचकांचा अगदी भरभरून प्रतिसाद लाभला आहे.
आपल्या प्रत्येकाच्या जगण्यात कमी-जास्त समस्या, त्रास, वाईट- मनस्ताप देणारे अनुभव, प्रसंग असतातच; पण त्याच आपल्या आयुष्यात चांगलं, समाधानकारक, दिलासादायक, जगण्याची खरी कारणं देणारंही खूप काही असतं. जीवनाचं वास्तव, सत्य हेच आहे.
आणि हेच सत्य, आपल्या आयुष्यातील हीच सकारात्मकता अधोरेखित करणारं हे सारं लेखन आहे.
– प्रकाशक