बाहुली आणि खुळखुळा

350.00

(Bahuli aani Khulkhula)

गूढकथा या अज्ञात, दैवी किंवा अनाकलनीय अशा शक्ती किंवा जगाशी संबंधित कथा असे समजले जाते. ह्या कथा बऱ्याच वेळा गढी, ओसाड पडके वाडे, निर्मनुष्य रस्ते, जंगले, पिंपळ, चकवा, तळे डबकी, गुहा अशा एकांत ठिकाणी घडतात. अतृप्त आत्मे, भुते, अनाकलनीय स्वप्ने यामधून गूढाचं सूचन करत राहतात. ओघवतं कथानक अगम्य रस्त्यावरून वाचकाला अलगद त्याठिकाणी घेऊन जातं आणि गूढ गर्तेत अडकलेला वाचक सुटकेची वाट बघू लागतो. अशाप्रकारे वाचक जेव्हा कथेत गुंगून जातो तेव्हा लेखकाची कथा यशस्वी झालेली असते.

`बाहुली आणि खुळखुळा` या कथासंग्रहातील ‘कुरोली-औंध-कुरोली’ या कथेत बंद पडलेल्या वसतिगृहातली अनामिका येऊ घातलेल्या संकटातून नायकाची सुटका करू पाहते- त्याला स्वप्नातून, भासातून सतर्क करत राहते. मात्र नायक त्या संकटातून बाहेर पडतो की संकटं त्याला घेरून राहतात हे जाणण्यासाठी कथाच वाचायला हवी. `कोळेश्वर` कथेत तरुण लेखकाच्या स्वप्नात जाऊन त्याचा ताबा घेऊ पाहणारी तरुणी जेव्हा त्याला प्रत्यक्षात दिसते तेव्हा काय होते? विज्ञानाच्या अंगाने जाणारी ही गूढ कथाही मुळातूनच वाचायला हवी. ‘बाहुली आणि खुळखुळा’ या कथेत कथानायक ऑफिसातल्या शिपायाबरोबर त्याच्या आदिवासी गावात होळीचा सण बघायला उत्सुकतेपोटी जातो. तिथल्या विचित्र चालीरिती, गावपाटलाने दिलेली बाहुली आणि खुळखुळ्याची भेट, त्या बाहुलीचे थरारक वर्णन, आदिवासींची बोली भाषा आणि नायकावर हल्ला करण्यासाठी आलेले प्राणी… सर्वच अविश्वसनीय आणि औत्सुक्य वाढविणारं आहे.

‘प्रभावक्षेत्र,` `बूट,` `किल्ले शहागड,` `सात आसरांचा महाल,` `मी, गढी आणि सोनेरी तबकडी,` `दे दान सुटे गिऱ्हान’ या कथांत लेखकाचे शिक्षकी पेशातील अनुभव, तेथील वास्तव्य यांचे वर्णन आले असावे असे वाटते. औरंगाबाद, जळगाव, नेरी, सह्याद्रीच्या रांगा, खानदेश आणि परिसर हा लेखकाच्या विशेष परिचयाचा आणि आवडता आहे हे जाणवत राहते.

या कथासंग्रहातील पंधराही कथा त्यातील गूढ वातावरणाने वाचकाला खिळवून ठेवतील आणि वाचकांच्या भयानंदात भर घालतील. वाचकांनी जरूर संग्रही ठेवावे आणि वाचनाचा पुनःप्रत्यय घ्यावा, असे हे लेखन आहे.

– नीलिमा कुलकर्णी
संपादक- धनंजय.

Description

ले. शरद पुराणिक

You may also like…