सावली
₹210.00
(Savli)
ले. सुभा लोंढे
~
‘सावली’ हा केवळ ललित लेखसंग्रह नाही; तर मराठी ग्रामीण संस्कृती, लोकपरंपरा, लोकजीवन आणि मानवी भावविश्व यांचे जिवंत शब्दचित्र उभे करणारा अनुभवसमृद्ध दस्तऐवज आहे. लेखिका श्रीमती सुभा लोंढे यांनी ग्रामीण जीवनातील प्रसंग, आठवणी, संस्कार आणि तेथील समाजात होत असणारे बदल अत्यंत ओघवत्या, सहज आणि हृदयस्पर्शी भाषेत शब्दबद्ध केले आहेत.
या संग्रहातील एकोणीस लेखांतून ग्रामीण महाराष्ट्राचे अनेकविध पैलू उलगडत जातात. शेतीची परंपरा, श्रमसंस्कृती, गावाकडील नाती, लोककला, लोकगीतांची परंपरा, ओव्या, भलरी, पारंपरिक खेळ, सण-उत्सव, सामाजिक मूल्ये आणि बदलत्या काळात हरवत चाललेली मूळ जीवनशैली यांचा अत्यंत जिवंत वेध या पुस्तकात घेतला आहे.
ग्रामीण संस्कृतीतील विविध संदर्भ जतन करण्याचा मोलाचा प्रयत्न या पुस्तकातून दिसून येतो. त्यामुळे हे पुस्तक केवळ वाचनाचा आनंद देत नाही, तर आपल्या सांस्कृतिक वारशाची जपणूकही करतं.
लेखिकेची शैली ही कृत्रिम अलंकारिकतेपेक्षा अनुभवांच्या प्रामाणिकतेवर आधारलेली आहे. प्रत्येक लेखात वास्तवाचा स्पर्श आहे; आणि म्हणूनच वाचकाला प्रत्येक लेख आपला वाटतो. लेखिकेची संवेदनशीलता येथे पानोपानी जाणवते.
हे पुस्तक जुन्या पिढीला आठवणींची ऊब देणारे, तर नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांची ओळख करून देणारे ठरते. मराठी भाषा, विशेषतः ग्रामीण बोलीतील शब्दवैभव आणि अभिव्यक्तीची ताकद अनुभवण्याची संधीही या पुस्तकातून मिळते. संशोधक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि लोकसंस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही हा संग्रह उपयुक्त संदर्भग्रंथ ठरू शकतो.
– पराग रघुनाथ लोणकर
प्रकाशक, लेखक व प्रमुख कार्यवाह – अ. भा. मराठी प्रकाशक संघ




