Description
ले. सौ. प्रिया जोशी
I love the man I married,
Soldiering is his life,
But I stand among the silent ranks,
Known as the- `ARMY WIFE…`
एका अज्ञात कवीने लिहिलेल्या या ओळी अगदी मोजक्या आणि समर्पक शब्दांत एका सैनिकाच्या पत्नीची ओळख करून देतात. प्रिया जोशी या अशाच एक सैनिकपत्नी आहेत. तसं पाहता सैनिकांबद्दल, त्यांच्या देशप्रेमाबद्दल सामान्य नागरिकांमधे बरीच जागरूकता आढळून येते; पण सैनिकाच्या कुटुंबियांच्या जीवनाबद्दल, त्यांना येणाऱ्या अनुभवांबद्दल मात्र आपण बऱ्याच वेळा अनभिज्ञ असतो.
लग्नाआधी संपूर्णत: सिव्हील लाईफ जगलेल्या आणि लग्नानंतर मिलिटरी लाईफचा अनुभव घेतलेल्या प्रिया जोशी यांनी या दोन वेगळ्या विश्वांतलं अंतर भरून काढण्यासाठी; सिविलीयन्सना मिलिटरीतील जीवनाची ओळख करून देण्यासाठी केलेलं स्वानुभवकथन म्हणजे हे पुस्तक- माझी सैन्यगाथा!
हे पुस्तक वाचताना लेखिकेला भारताच्या कानाकोपऱ्यांत आलेले नानाविध अनुभव वाचताना आपणही त्यांत गुंतत जातो. या अनुभवांची व्याप्ती खूप मोठी आहे… कधी गमतीदार तर कधी लेखिकेची परीक्षा घेणारे; कधी मनाला सुखावणारे तर कधी माणुसकीची विविध रूपे दाखवणारे! हे वाचत असताना आपण नकळत लेखिकेच्या भावविश्वात गुंततो आणि मग सामान्यत: अतर्क्य वाटणाऱ्या काही गोष्टींमागचा खरा अर्थ आपल्याला कळू लागतो… ‘No news is good news!’ किंवा ‘I was alone but not lonely!’ अशी विधाने आपल्याला अंतर्मुख करून जातात.
प्रिया जोशी यांच्या पूर्वप्रकाशित ‘एक होता कॅन्सर’ या पुस्तकाप्रमाणेच त्यांचं हे ‘माझी सैन्यगाथा’ पुस्तकही वाचनीय आणि संग्रहित करून ठेवण्यासारखं आहे!
~~~~~~~~~~~~