ककाकलेना
₹400.00
(Kakakalena)
ले. चुडाराम बल्हारपुरे
साहित्याशी संवाद साधणारा ‘ककाकलेना’
एखाद्या पुस्तकाचे वाचन आपल्याला त्या साहित्यकृतीच्या जगात घेऊन जाते; तर त्या पुस्तकावरील समीक्षण तिच्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी देते. श्री. चुडाराम बल्हारपुरे यांचा ‘ककाकलेना’ हा एकवीस पुस्तकांच्या समीक्षणांचा संग्रह अशाच साहित्यसंवादाचे निमित्त ठरतो.
नाटककार, लेखक आणि कवी म्हणून श्री. बल्हारपुरे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. स्वतः सर्जनशील लेखन करणारा साहित्यिक जेव्हा दुसऱ्या लेखकाच्या साहित्यकृतीकडे पाहतो, तेव्हा त्या लेखनामागील अनुभव, संवेदना आणि अभिव्यक्तीची धडपड समजून घेण्याची एक वेगळी क्षमता त्याच्याजवळ असते. ‘ककाकलेना’कडे पाहताना श्री. बल्हारपुरे यांच्या या सर्जनशील पार्श्वभूमीची विशेष दखल घ्यावी लागते.
समीक्षणाचे महत्त्व केवळ पुस्तकाचा परिचय करून देण्यापुरते मर्यादित नसते. वाचकाच्या मनात त्या पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण करणे, त्यातील विचारांकडे लक्ष वेधणे आणि स्वतंत्रपणे वाचण्याची प्रेरणा देणे, हीदेखील त्याची महत्त्वाची कामे आहेत. एकवीस पुस्तकांचा एका संग्रहात घेतलेला हा वेध वाचकाला विविध साहित्यकृतींच्या सहवासाची संधी देतो. त्याचबरोबर एका साहित्यप्रेमी लेखकाच्या वाचनप्रवासाचीही ओळख करून देतो.
आज विपुल प्रमाणात पुस्तके प्रकाशित होत असताना, त्यांची दखल घेणारे आणि त्यांवर विचारपूर्वक लिहिणारे लेखन आवश्यक आहे. असे लेखन लेखक आणि वाचक यांच्यातील नाते अधिक दृढ करते. या दृष्टीने श्री. बल्हारपुरे यांचा हा उपक्रम स्वागतार्ह आहे. स्वतंत्रपणे लिहिलेली समीक्षणे ग्रंथरूपाने एकत्र आणल्यामुळे ती अधिक काळ वाचकांसाठी उपलब्ध राहणार आहेत, हीदेखील आनंदाची बाब आहे.
श्री. चुडाराम बल्हारपुरे यांच्या या साहित्यप्रयत्नाला आणि त्यांच्या पुढील लेखनप्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा!
– पंडित कवठेकर
(संपादक, मुद्रितशोधक आणि अक्षरजुळणीकार)
~
साहित्यकृतींच्या अंतरंगाचा अचूक वेध घेणारा समीक्षाग्रंथ – ‘ककाकलेना!’
‘ककाकलेना’ साहित्याकडे अधिक डोळसपणे पाहण्याची दृष्टी देणारा, नवोदित लेखकांना मार्गदर्शन करणारा आणि विविध साहित्यकृतींची ओळख करून घेण्याची उत्सुकता वाढवणारा समीक्षाग्रंथ आहे. या पुस्तकाच्या रूपाने श्री. चुडाराम बल्हारपुरे यांनी मराठी साहित्यविश्वात एका उत्तम समीक्षाग्रंथाची भर घातली आहे.
– पराग रघुनाथ लोणकर
(लेखक, प्रकाशक आणि प्रमुख कार्यवाह: अ. भा. मराठी प्रकाशक संघ)




